Thursday 23 April 2015

एल.सी.डी. प्रोजेक्टरचे स्वप्न साकार होत आहे

काही झाले तरी आपल्या शाळेत एल.सी.डी.प्रोजेक्टर आणयचा आणि विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने अध्यापन करायचे असा चंग मनाशी बांधला आहे. त्या दिशेने प्रयत्न करत असताना एक आशेचा किरण दिसू लागला आहे. शाळा व्यवस्थापन समिती व मा. सरपंच यांच्याशी चर्चा करून त्यांना एल.सी.डी.प्रोजेक्टरचे महत्त्व समजावून सांगितले. ज्या शाळांमध्ये त्याचा वापर होत आहे अशा शाळांची भेट घेऊन शाळा व्यवस्थापन समिती एल.सी.डी.प्रोजेक्टरच्या तयारीला लागली आहे. गावातून लोकवर्गणी जमा करूनच आपण एल.सी.डी.प्रोजेक्टर आपल्या शाळेत आणू आणि हे काम आपण जून 2015 अखेर पूर्ण करू असा चंग शाळा व्यवस्थापन समितीने बांधला आहे. मा.सरपंच आणि सदस्य, ग्रा.पं.सामनगाव ह्यांनीही या कार्यात आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. त्याबद्दल सर्व सन्माननीय पदाधिकारी, पालक व ग्रामस्थ यांचे मी आभार मानतो. एवढे सगळेजण आपला प्रामाणिक प्रयत्न करत असताना अपयश येण्याची दूर-दूर पर्यंत शक्यता वाटत नाही. त्यामूळे शाळेच्या डिजीटल वर्गखोलीची पूर्वतयारी सुरू झालेली आहे. लवकरच आमच्या शाळेचे एल.सी.डी.प्रोजेक्टरचे स्वप्न साकार होईल याची खात्री मला वाटत आहे.

श्री.राजेंद्रसिंग रामसिंग मोरकर
मुख्याध्यापक
जि.प.प्रा.शा.सामनगाव

Monday 30 March 2015

एक अभिनव उपक्रम

अधिकारी व्हायचंय मला
'अधिकारी व्हायचंय मला' या सकाळ वृत्तपत्र समूह व जिल्हा परिषद, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.29 मार्च 2015 रोजी MPSC-UPSC परीक्षांच्या धर्तीवर झालेल्या परीक्षेत माझ्या शाळेतील 15 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. परीक्षेचे नियोजन उत्तम होते. 12 km. प्रवास करून परीक्षा दिल्यानंतरही त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. एक वेगळ्याप्रकारची व भावी आयुष्यात मार्गदर्शक ठरणारी परीक्षा देण्याचा अनुभव या आगळ्या-वेगळ्या उपक्रमामुळे माझ्या खेड्यातील जि.प.शाळेतील मुलांना मिळाला. त्याबद्दल सकाळ वृत्तपत्र समुह व जि.प.नाशिक यांचे आभार. हा उपक्रम दरवर्षी व्हावा ही अपेक्षा.
पळसे केंद्रातील परीक्षेचा एक क्षण

परीक्षार्थींना मार्गदर्शन करताना मा.श्री.रवींद्रसिंह परदेशी, गटविकास अधिकारी, पं.स.नाशिक


परीक्षाकेंद्राला भेट देताना मा.श्री.अनिल शहारे, गटशिक्षणाधिकारी, पं.स.नाशिक

दि.30/03/2015 च्या दैनिक सकाळ मधील मला व्हायचंय अधिकारी संबंधी अधिक बातम्यांसाठी क्लिक करा

Sunday 29 March 2015

माझे DIGITAL SCHOOL चे स्वप्न


सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. प्रत्येकाला Android Mobile चे वेड लागले आहे. लहान-मोठ्या सगळ्यांची बोटे Android च्या टचस्क्रिनवर फिरायला लागली आहेत. विशेष म्हणजे मोठ्यांपेक्षा लहान मुले अगदी सफाईदारपणे Touch Screen हाताळतात. मुलांच्या विशेष आवडीची गोष्ट म्हणजे Games आणि Music / Videos. मुलांच्या हाती एकदा मोबाईल लागला की, तासन् तास अगदी एकाग्र होऊन मोबाईलशी खेळत असतात. हे चित्र फक्त शहरातच नाही तर खेड्यातही अगदी सर्रास दिसू लागले आहे. अशावेळी त्याला 'पुस्तक-वही घे आणि अभ्यासाला बस..' असे आपण सांगितले तर त्याची नाराजी त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येते. अभ्यासाला बसायचा आपला उपदेश जरी त्याने नाईलाजास्तव ऐकला तरी अभ्यासामध्ये त्याचे मन किती रमेल याची आपण कल्पना करू शकतो.

मुलांच्या Touch Screen च्या वेडाचा आपल्याला अभ्यासासाठी उपयोग करून घेता येईल का ? मुले मोबाईलमध्ये जेवढे तल्लीन होतात तेवढे अभ्यासामध्ये तल्लीन होतील का ? या प्रश्नांचा एका जि.प.शाळेचा मुख्याध्यापक म्हणून विचार करत असतांना एकच प्रभावी उत्तर सापडले. ते उत्तर म्हणजे त्याचा रोजचा अभ्यासच त्याला Touch Screen वर Games, Activities आणि कार्टुन्सच्या स्वरूपात उपलब्ध करून दिला तर हे शक्य आहे. 
आज इंग्रजी व मराठीतून विद्यार्थ्यांसाठी अनेक Apps उपलब्ध आहेत. तसेच संपूर्ण अभ्यासक्रमही सॉफ्टवेअरच्या रूपाने उपलब्ध आहे. तसेच Activity Based E-Books सुध्दा उपलब्ध आहेत. या सर्वाचा कल्पकतेने वापर करून विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे आकर्षित करता येऊ शकते. त्यासाठी गरज आहे फक्त एका साधनाची. ते साधन म्हणजे I-Pad. आयपॅड हे असे साधन आहे की, त्यात विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या अभ्यासाच्या सर्व Apps व Softwares सोबतच इतर सामान्यज्ञान व मनोरंजनाचे साहित्यही सहज उपलब्ध करून देता येऊ शकते. शिवाय कॉम्प्युटर आणि लॅपटॉप या सारख्या महागड्या साधनांपेक्षा त्याची किंमतही बरीच कमी आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझेही कमी करणे शक्य होईल.
वरील सर्व बाबींचा विचार करता विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे आकर्षित करण्याकरीता आयपॅड अतिशय उपयोगी ठरेल. परंतु, अडचणीचा भाग आहे तो म्हणजे आयपॅडसाठी आमच्या सारख्या गरीब शाळांनी निधी कसा उभा करावा ? एका शाळेकरीता 8 ते 10 आयपॅड पुरेसे होतील. कारण गटाने त्याचा वापर केल्यास विद्यार्थी-विद्यार्थी आंतरक्रिया चांगली होईल. 8 आयपॅडसाठी साधारणत: 48000/- ते 56000/- इतका खर्च येऊ शकतो. त्यासाठी गावातील काही दानशूर व्यक्ती किंवा संस्था पुढे आल्यास माझे Digital School चे स्वप्न पूर्ण होण्यास काही वेळ लागणार नाही. 
माझा हा बऱ्याच प्रमाणात लांबलेला लेख वाचणारे कुणी शिक्षक असतील, कुणी अधिकारी असतील, सामाजिक कार्यकर्ते, नेते, पालक, व्यावसायिक, अन्य क्षेत्रातील नोकरदार किंवा बेरोजगार तरूणही असतील. आपण ठरवले तर आपापल्या परीने आपण आमच्या शाळांना याकामी मदत करू शकता. कसे ते आपणच ठरवा. 
ता.क.
चांगली असो वा वाईट आपली Comment (प्रतिक्रीया) जरूर कळवा.
धन्यवाद.