Tuesday 7 February 2017

पायाभूत सुविधांचा श्रीगणेशा शिक्षक सहभागातून

     माझ्या शाळेत एकूण १७० विद्यार्थी आहेत. जून २०१६ पासून जि.प.प्राथमिक शाळा, उंबरकोन, ता.इगतपुरी, जि.नाशिक या शाळेचा मुख्याध्यापक पदाचा कारभार स्वीकारला तेंव्हापासून काही महत्त्वाचे विषय डोक्यात होते. पहिला म्हणजे पिण्याच्या पाण्याची सुविधा. विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे. ही मुख्याध्यापकाची जबाबदारी नंतर ठरते. प्रथम ते मुख्याध्यापकाचे कर्तव्यच असते. असे माझे ठाम मत आहे. मात्र हे कर्तव्य तसेच जबाबदारी पार पाडणे हे मोठे दिव्यच आहे. प्रथमदर्शनी तरी माझ्यासह सर्वांना असेच वाटत होते. पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसाठी नजरेसमोर असणाऱ्या सर्व शक्यता मी पडताळून पाहू लागलो. सध्यातरी त्यावर गुणकारी उपाय सापडत नव्हता. 
          एकेदिवशी दुपारचे जेवण करतांना माझ्या सहकाऱ्यांशी या विषयावर चर्चा केली. चर्चा सुरु असतांना एक विचार पुढे आला. क्षणाचाही विलंब न करता तो विचार अमलात आणायचा असे ठरवले गेले. पाण्याची ७०० फुट पाईपलाईन, किमान १००० ली. क्षमतेची पाण्याची टाकी. ६ ते ८ नळ, त्यासाठी पक्के बांधकाम, त्याआधी जुने बांधकाम हटवणे, जागा तयार करणे. इत्यादी इत्यादी. अंदाजे खर्च रु.२५,०००/- ते रु.३०,०००/-. कोणतेही अनुदान नाही. सध्या कोणताही लोकसहभागही जमा होण्याची काही शक्यता नव्हती. म्हणून आम्ही सर्वांनी हे काम शिक्षक सहभागातून करायचे ठरवले. आणि हाच तो विचार होता जो आमच्या त्यादिवसाच्या चर्चेतून समोर आला होता. प्रथम विचार मनात आला आणि लगेच तो अमलात आणला. या गोष्टीसाठी माझ्या सर्व सहकाऱ्यांना त्यांच्या मुख्याध्यापकाचा सलाम.
        माझ्या प्रत्येक म्हणजे ६ सहकाऱ्यांनी प्रत्येकी रु.३०००/- जमा केले. उर्वरित मी केले. असे एकूण रु.१८०००/- + रु.१००००/- = रु.२८,०००/- जमा झाले. गाव पाणीपुरवठ्याच्या टाकीतून पाऊन इंची डायरेक्ट कनेक्शन मिळाले. डायरेक्ट कनेक्शन म्हणजे गावाच्या पाणी पुरवठ्याच्या वेळेवर अवलंबून न राहता शाळेला पाहिजे तेंव्हा पाणी मिळेल असे कनेक्शन. त्याबद्दल उंबरकोन ग्रामपंचायतीचे मन:पूर्वक आभार. गावातीलच श्री.प्रकाश भांगरे नावाचा एक चांगला कारागीर मिळाला. एकदम कमी मोबदल्यात कमी वेळेत त्यांनी काम पूर्ण केले. आणि शिक्षक सहभागातून आमची एक महत्त्वाची प्रथम पायाभूत गरज पूर्ण झाली. प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र समारंभात विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते जलपूजन करण्यात आले. पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिल्याचा जेवढा आनंद आम्हां शिक्षक, पालक व ग्रामस्थांना झाला त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मोठा आनंद आमच्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आम्ही पाहिला.



      अशाप्रकारे पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या पायाभूत सुविधेचा श्रीगणेशा माझ्या शिक्षकांच्या सहभागातून झाला. याचा मला सार्थ अभिमान वाटतो.

             







      आता प्रत्येक वर्गात ई-लर्निंग साठी एक ३२ इंची टीव्ही आणि अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर असावे या दृष्टीने विचार सुरु आहे. अजमाईश कडी है, इम्तेहान मुश्कील है, लेकीन हौसला बुलन्द है l त्यासाठी लोकसहभाग नक्कीच मिळेल यात शंका नाही. कारण पालकांचा आणि गावाचा विश्वास जिंकण्यात आम्ही नक्कीच यशस्वी झालो आहोत. परंतु गावातल्या लोकसहभागातून एवढे मोठे लक्ष्य साध्य होणे अवघड आहे. त्यासाठी आपल्यासारख्या सन्मित्रांची आवश्यकता भासेल. प्रत्येकवेळी आर्थिक सहकार्यच उपयोगी पडते असे नाही. आपल्या शुभेच्छा मिळाल्या आणि पाठीवर हात ठेवून नुसतं लढ म्हटलं तरी काम होईल. 

धन्यवाद !
              आपलाच
             श्री.राजेंद्रसिंग रामसिंग मोरकर
             मुख्याध्यापक
             जि.प.प्राथमिक शाळा, उंबरकोन
             ता.इगतपुरी, जि.नाशिक
             9421562194