Tuesday 13 September 2016

लोकसहभागातून शाळासिद्धीच्या दिशेने पहिले पाऊल

ग्रामीण आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेला लोकसहभाग मिळविणे म्हणजे एक दिव्यच म्हणावे लागेल. पण एकदा गावाचा विश्वास संपादन केला की हेच दिव्य अगदी सहज शक्य होतानाही आपण अनुभवलेले आहे. 
शाळेला ई-लर्निंगसाठी एक संगणक संच असावा यासाठी गेल्या महिनाभरापासून प्रयत्न सुरु होता. त्या प्रयत्नाला यश आले. मा.आमदार ताई यांच्या निधीतून एक संगणक मंजूर केला. रोटरी क्लबकडून  ई-लर्निंग संच लवकरच प्राप्त होणार आहे. माझ्या शाळेला दैनंदिन परिपाठ व इतर प्रासंगिक कार्यक्रमासाठी एका चांगल्या साऊंड सिस्टिमची आवश्यकता होती. तसेच आता शाळा डिजीटल होणार आणि गावात १०-१२ तास लोड-शेडींग असणार. मग त्या ई-लर्निंग आणि डिजीटलला काय अर्थ असणार ? म्हणून त्यावर उपाय शोधणे गरजेचे होते. एखादा Power Inverter उपलब्ध झाला तर ? पण सध्या यासाठी शाळेकडे एक पैसाही उपलब्ध नाही. मग हे कसे शक्य होईल ? अनेक वेळा हाच विषय आणि हीच चिंता मी गावचे शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांना सांगत राहिलो. त्याचा परिणाम आज शाळेला रुपये ४०,०००/- चा लोकसहभाग मिळाला.  त्यातून शाळासिद्धीच्या दिशेने एक पाऊल टाकणे शक्य झाले.


                     (रु.२५५००/- चा Inverter)







------------------------------------------------------------------------------







(रु.१४५००/- चा portable Rechargeble Sound System)



मार्ग खडतर आहे त्यावर चालणे अवघड आहे पण अशक्य मात्र नक्कीच नाही. याबाबत मी आणि माझे सर्व सहकारी एकमताने काम करत आहोत म्हणून हे शक्य होत आहे. 
सुरुवात तर चांगलीच झाली. अजून खूप काही होवू शकते. त्यासाठी सतत प्रयत्नशील आहे.

श्री.राजेंद्रसिंग मोरकर 
मुख्याध्यापक 
जि.प.प्राथमिक शाळा, उंबरकोन
ता.इगतपुरी, जि,नाशिक

Monday 12 September 2016

नवीन शाळेतील माझ्यासमोरची आव्हाने

जून 2016 पासून जि.प.प्राथमिक शाळा, उंबरकोन, ता.इगतपुरी, जि.नाशिक या शाळेत बदली झाली. येथे मुख्याध्यापक म्हणून पदभार स्वीकारताना माझ्यासमोर मला काही आव्हाने दिसत होती. इ. 1 ली ते 7 वी पर्यंत वर्ग. एकूण 170 विद्यार्थी. आम्ही 8 शिक्षक. शाळेची गुणवत्ता तशी चांगलीच आहे. मुलं चुणचुणीत आहेत. परंतु भौतिक सुविधांवर मात्र अजून खूप काम करावे लागेल. सर्वांसाठी पुरेशा पाण्याची व्यवस्था, अद्ययावत स्वच्छतागृह, विद्युतीकरण ह्या मूलभूत बाबी पूर्ण करणे हे माझे प्रथम काम आहे. त्यादृष्टीने कार्यवाही सुरु झाली आहे.
त्यानंतर लवकरच शाळा ई-लर्निंग करणे, डिजीटल शाळेचे सर्व निकष पूर्ण करून 'शाळा सिद्धी' च्या दिशेने वाटचाल करणे. हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून कामकाज सुरु आहे. आज नाही तर उद्या, पण यश नक्कीच मिळेल यात मलातरी शंका नाही.

Sunday 28 February 2016

स्वप्न साकार झाले



'माझे डिजीटल शाळेचे स्वप्न' या शीर्षकाचा एक लेख जवळपास एक वर्षापूर्वी मी माझ्या ब्लॉगवर लिहिला होता. 'डिजीटल शाळा' हे एकच ध्येय उराशी बाळगून मी तेंव्हापासून कामाला लागलो. पदाधिकारी, अधिकारी व सहकारी यांच्या सहकार्यातून वर्षभरात केवळ लोकसहभागातून माझी शाळा डिजीटल झाली.
कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी आधी सूक्ष्म पातळीवरचे नियोजन आवश्यक असते. आणि ते नियोजन राबविण्यासाठी स्वतःला झोकून देऊन काम करावे लागते. त्यानुसार काम केले आणि त्याचे फळही मिळाले.
तालुका व जिल्हाभरात संगणकाच्या कामांसाठी शिक्षकमित्र व अधिकारी मला ओळखतात. संगणकाशी संबंधित कोणतेही काम असले की मोरकर सरांचे नाव समोर येते. पण माझ्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंगची सुविधा नाही, हे सांगताना मला फार वाईट वाटत होते. आजही अनेक शाळा अशा आहेत की, तेथे संगणक प्रयोगशाळा आहे, लोकवर्गणी भरपूर असल्याने LCD प्रोजेक्टर आहे, सुसज्ज हॉल आहे. परंतु, संगणक हाताळणारे शिक्षक नसल्याने ही महत्वपूर्ण साधने फक्त वस्तू म्हणून शाळेत पडून आहेत. त्यांचा वापर नसल्याने ते नादुरुस्त झाले आहेत. आणि ज्याठिकाणी हे सर्व हाताळणारे सकुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे त्या ठिकाणी साधने उपलब्श नाहीत. माझ्या बाबतीतही असेच होते. परंतु, सध्याच्या काळात वाडी-वस्तीवरील अनेक शाळांमध्ये ह्या सुविधा काही सामाजिक संस्था, लोकसहभाग आणि शिक्षक सहभागातून मिळवून त्याचा प्रभावी वापर होण्याची चळवळच जणू आपल्या महाराष्ट्रात सुरु झालेली आहे. त्यातलाच मीही एक.
नाशिक तालुक्यातील जवळपास ज्या शाळांमध्ये ई-लर्निंगची सुरुवात झालेली आहे त्या शाळांना माझ्या शाळा व्यवस्थापन समितीच्या भेटीचे नियोजन केले. त्या भेटींमधून शाळा व्यवस्थापन समितीला ई-लर्निंगचे महत्त्व समजावून दिले. यातच माझे ६०% ध्येय साध्य झाले. वर्गखोलीची रंगरंगोटी, पडदे, लाईट फिटींग, पंखे इ. बाबी व प्रोजेक्टर यासाठी निधी कसा उभा करावा याच गोष्टीचा आम्ही सर्वजण विचार करत होतो. तेंव्हा लहान लहान पावती पुस्तके छापून वर्गणी गोळा करण्याचे सर्व सदस्यांनी मान्य केले. एल.सी.डी.प्रोजेक्टरसाठी रोटरी क्लबकडे मागणी केली. प्रोजेक्टर आज मिळेल उद्या मिळेल या अपेक्षेने वर्गखोली तयार करण्याची लगबग सुरु झाली. सदस्यांनी आपापल्या लोकसंपर्कानुसार वर्गणी गोळा केली आणि पाहता पाहता ४००००/- रुपये गोळा झाले. गावातील पेंटरने कमी पैशात उत्कृष्ट वर्ग तयार करून दिला. इलेक्ट्रिशियनने ना नफा ना तोटा या तत्वाने फक्त साहित्याचे पैसे घेतले. मजुरी घेतली नाही. डिसेंबर अखेर वर्ग तयार झाला. परंतु, एल.सी.डी.प्रोजेक्टर मिळण्याचे चिन्ह काही दिसत नव्हते. ती शक्यता हळूहळू धूसर होत चालली होती. शेवटी शाळा व्यवस्थापन समितीने ठरवले की, आता आपण आपल्या लोकवर्गणीतूनच प्रोजेक्टर आणू. आता जास्त काळ थांबणे शक्य नव्हते. कारण इतर शाळांच्या मानाने अजून एका वर्षाने मागे पडणे आम्हाला अजिबात मान्य नव्हते.
एल.सी.डी.प्रोजेक्टरची शोधाशोध सुरु झाली. शेवटी EPSON चा 3200 lumense चा EB-S31 हा प्रोजेक्टर आम्ही खरेदी केला. शाळेतीलच एक संगणक जोडून संच तयार केला. शिक्षकाला वर्गात हालचाल करण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी सोयीचा म्हणून cordless mouse व keyboard चा वापर केला. ई-लर्निंगचे स्वप्न पूर्ण झाले. उद्घाटनाच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. दिनांक १९ जानेवारी २०१६ रोजी मा.ना.विजयश्रीताई चुम्भळे, अध्यक्षा, जि.प.नाशिक, मा.श्री.अनिलजी ढिकले, उपसभापती, पंचायत समिती, नाशिक,  मा.श्री.रवींद्रसिंग परदेशी, गटविकास अधिकारी (उ.श्रे.), पंचायत समिती, नाशिक यांच्या शुभहस्ते उद्घाटन झाले. मा.श्री.अनिल शहारे, गटशिक्षणाधिकारी यांची प्रेरणा व मा.भाऊसाहेब जगताप, विस्तार अधिकारी (शिक्षण) आणि मा.श्रीमती एस.जी.घमंडी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
आमचे सरपंच मा.श्री.विजय जगताप यांनी चांगली आर्थिक मदत मिळवून दिली. SMC उपाध्यक्ष, मा.बाळकृष्ण जगताप यांनी निधी संकलनाबरोबरच अहोरात्र धावपळ करून खूप सहकार्य केले. मा.सौ.चंद्रकला जगताप, सौ.शकुंतला जगताप, श्री.शरद जगताप व श्री.रामदास जगताप या सर्वांच्या प्रयत्नांनी हे स्वप्न साकार झाले.
फक्त ई-लर्निंगनेच सर्व साध्य होणार नाही म्हणून माझ्या सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी आपापल्या वर्गासाठी अत्यंत उत्कृष्ट व उपयुक्त ज्ञानरचनावदाचे साहित्य तयार करून त्याचा वापर करत आहेत.  ई-लर्निंगचे स्वप्न साकार झाले. आता  ई-लर्निंग व ज्ञानरचनावद यांच्या सहाय्याने अप्रगत विद्यार्थी विहीन शाळा हे स्वप्न साकार करण्याचे काम सुरु आहे.
धन्यवाद !!!