Sunday 29 November 2020

शाळा सुरु होतांना

       


     कोविड-19, कोरोना हे असे शब्द आहेत की, त्यांनी केवळ काही महिन्यांमध्ये सबंध विश्वाला आपली विनाशकारी शक्तीची झलक दाखवून दिली. बस, टॅक्सी, रेल्वे, विमान, हॉटेल्स, लहानमोठे उद्योग, कारखाने, कार्यालये सर्वकाही बंद बंद आणि बंद. सामान्य माणसाला जीवनावश्यक वस्तूंसाठीही घरातून बाहेर पडणे बंद करून टाकले. मोठमोठे उत्सव, सण, समारंभ, लग्न कार्यात होणारी गर्दी सारे काही बंद. एवढंच काय तर अंत्यविधीलासुद्धा वीस पेक्षा जास्त लोकं जमत नाहीत. या सगळ्या गोष्टींवर सरकारला निर्बंध घालावे लागलेत. हे निर्बंध काटेकोरपणे पाळले गेले नसते तर ........ तर नक्कीच आपल्या देशाची, आपल्या राज्याची परिस्थिती आज आहे त्यापेक्षा निश्चितच खूप वेगळी राहिली असती. हे वेगळे सांगायला नको. शासनाने बंद केलेल्या अनेक गोष्टींमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे. ती गोष्ट म्हणजे शाळा. कोरोनाचा प्रभाव जसजसा कमी व्हायला सुरुवात झाली तसतश्या बंद केलेल्या सर्व गोष्टी हळू हळू पूर्वपदावर येवू लागल्यात. मात्र शाळा अजून पूर्वपदावर आल्या नाहीत. दिवाळीनंतर तरी शाळा सुरु होतील असे वाटत होते. पण दिवाळीच्या धामधूमीत आपण थोडे केयरलेस वागलो की काय (कदाचित याला सध्या वाढलेली थंडीही कारणीभूत असावी) पण दिवाळीपूर्वी अगदीच नगण्य होत चाललेले संसंर्गाचे आकडे दिवाळी संपता संपता पुन्हा फुगायला लागलेले दिसून आलेत. आणि त्यामुळे दिवाळीनंतर शाळा उघडेल या आशेवर असलेले विद्यार्थी, पालक, शिक्षक, शासन, शिक्षणप्रेमी, समाज या सर्वांचाच भ्रमनिरास झाला. शासन आणि प्रशासन यांनी शाळा सुरु करण्याची संपूर्ण पूर्वतयारी केलेली असतांना सुद्धा ऐनवेळी शासनाला शाळा सुरु करण्याचा विचार काही काळासाठी पुढे ढकलावा लागला. 

२०२० संपता संपता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल अशी अशा करूया. भारतासह जगभरात कोरोनाच्या लसीवर सुरु असलेल्या युद्धपातळीवरील प्रयत्नांना यश येण्यासाठी विधात्याकडे मन:पूर्वक प्रार्थना करूया. असे जर झाले तर नक्कीच सध्याच्या विराण झालेल्या शाळांच्या इमारतींमध्ये पुन्हा एकदा बालगोपाळांची किलबिल ऐकायला मिळेल. सध्या आत्माविहीन अवस्थेत असलेल्या विद्यामंदिरात विद्यार्थीरूपी आत्मा येईल आणि ओसाड खंडर वाटणाऱ्या शाळेच्या इमारती सरस्वतीची खरीखुरी मंदिरे बनतील. अशी आशा करूया. तोपर्यंत अजून काही दिवस पालकच आपल्या बालकांचे शिक्षक आहेत. पालकांनी आपल्या मोबाईलवर येणाऱ्या अभ्यासविषयक बाबींसाठी आमच्या विद्यार्थ्यांना सहकार्य करा. डिजिटल  पॅरेंन्टींगची संकल्पना समजून घेऊन मुलांना अभ्यासात मदत करा. हीच अपेक्षा आहे.

विश्वास ठेवा शाळा लवकरच सुरू होतील आणि यावर्षी मागे राहिलेला अभ्यास पूर्ण करून घेण्याचे प्रामाणिक प्रयत्न शाळांमार्फत नक्कीच केले जातील. तोपर्यंत आपण सर्वजण कोविड-19 चे सर्व नियम पाळूया. शासन आणि प्रशासनाकडून वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करून आपले व आपल्या कुटुंबाचे रक्षण करूया. 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' हे कुटुंबातील लहानमोठे सगळ्यांनी कायम लक्षात ठेवा. कोरोनाची लस अजून आलेली नाही, त्यावर परफेक्ट औषधही अजून बाजारात उपलब्ध नाही. मग का म्हणून विषाची परीक्षा बघायची. गेल्या आठ महिन्यांमध्ये जगभरात कोरोनाचे एवढे भयानक तांडव सुरु असतानाही त्याला आपण आपल्यापर्यंत पोहचू दिले नाही. आता तर त्याचा अंत व्हायची वेळ आलेली आहे. मग आता थोड्याकरता तरी त्याला कशाला जवळ येण्याची संधी द्यायची. हत्ती निघून गेला आता फक्त शेपूट बाकी आहे. एवढे लक्षात ठेवा आणि त्यासाठी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.

No comments:

Post a Comment

Thanks ! Please visit again.
कृपया आपली प्रतिक्रिया खाली जरूर नोंदवा.