Saturday, 2 May 2026

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उंबरकोन - वार्षिक निकाल २०२५-२६

 

निकाल बघण्यासाठी क्लिक करा

👇




            शैक्षणिक वर्ष २०२५-२६ संपलेले असून दरवर्षी १ मे ही निकालाची तारीख असते. याही वर्षी १ मे रोजी वार्षिक निकाल जाहीर होणार आहे. १ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांची निकालाची उत्सुकता ताणली जाणार आहे. 
        यावर उपाय म्हणून दरवर्षाप्रमाणे याही वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतरिम निकालाप्रमाणे किंवा इतर स्पर्धा परीक्षांच्या ऑनलाईन निकालाप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपणही अंतरिम निकाल जाहीर करावा असा विचार मनात आला. मा.श्रीमती मंजुषा साळुंके मॅडम, गटशिक्षणाधिकारी, पं.स.इगतपुरी यांची प्रेरणा व मा. श्री. पांडुरंग शिंदे, केंद्रप्रमुख, देवळे यांचे पाठबळ, तसेच शाळेतील सर्व शिक्षक सहकाऱ्यांची मदत. यामुळे अल्पकालावधीतच तयारी करून अगदी 10 वी, 12 वी बोर्डाचे निकाल किंवा कॉलेजच्या निकालांसारखा किंवा विविध स्पर्धा परीक्षांच्या ऑनलाईन निकालाप्रमाणे निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न केला आहे. हा निकाल माझ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उंबरकोन या शाळेच्या इयत्ता १ ली ते ७ वी मध्ये शिकणाऱ्या एकूण १३८ विद्यार्थ्यांसाठी  मर्यादित आहे.
          
  • प्रत्येकाच्या निकालाची गोपनीयता अबाधित राहावी यासाठी निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्याला आपला जनरल रजिस्टर नंबर टाकावा लागेल.
  • निकाल प्रिंट करण्याची आणि PDF फॉरमॅट मध्ये सेव्ह करण्याचीही सुविधा यात देण्यात आलेली आहे.




धन्यवाद !


Tuesday, 30 April 2024

जिल्हा परिषद आदर्श शाळा, माणिकखांब वार्षिक निकाल २०२३-२४

 

निकाल बघण्यासाठी क्लिक करा

👇




            शैक्षणिक वर्ष २०२३-२४ संपलेले असून दरवर्षी १ मे ही निकालाची तारीख असते. याही वर्षी १ मे रोजी वार्षिक निकाल जाहीर होणार आहे. १ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांची निकालाची उत्सुकता ताणली जाणार आहे. 
        यावर तोडगा काढण्यासाठी मधला मार्ग म्हणून शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतरिम निकालाप्रमाणे किंवा इतर स्पर्धा परीक्षांच्या ऑनलाईन निकालाप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपणही अंतरिम निकाल जाहीर करावा असा विचार मनात आला. आमचे प्रेरणास्थान मा.निलेशजी पाटील साहेब, गटशिक्षणाधिकारी, पं.स.इगतपुरी यांनी याकामी प्रोत्साहन दिले. तसेच मा.राजेंद्रजी नांदुरकर साहेब, विस्तार अधिकारी (शिक्षण) आणि मा.शमीम पठाण मॅडम, केंद्रप्रमुख, घोटी-२ यांनी पाठबळ दिले. शाळेतील सर्व शिक्षक सहकार्यांनी मदत केली. त्यामुळे अल्पकालावधीतच तयारी करून अगदी 10 वी, 12 वी बोर्डाचे निकाल किंवा कॉलेजच्या निकालांसारखा किंवा विविध स्पर्धा परीक्षांच्या ऑनलाईन निकालाप्रमाणे निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न केला आहे. हा निकाल माझ्या जिल्हा परिषद आदर्श शाळा, माणिकखांब या शाळेच्या इयत्ता १ ली ते ७ वी मध्ये शिकणाऱ्या एकूण ३९१ विद्यार्थ्यांसाठी  मर्यादित आहे.
          
  • प्रत्येकाच्या निकालाची गोपनीयता अबाधित राहावी यासाठी निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्याला आपला जनरल रजिस्टर नंबर टाकावा लागेल.
  • निकाल प्रिंट करण्याची आणि PDF फॉरमॅट मध्ये सेव्ह करण्याचीही सुविधा यात देण्यात आलेली आहे.




धन्यवाद !


Sunday, 26 February 2023

प्राथमिक शिक्षक बदली - २०२२ (टप्पा क्रमांक ६)

प्राथमिक शिक्षक बदली - २०२२ मधील क्रमांक १ ते ५ टप्पे यापूर्वी अधिकृत पोर्टल वर जाहीर झालेले आहेत. हे सर्व टप्पे संपल्यानंतरही अवघड क्षेत्रामधील काही जागा रिक्त राहिल्या असतील तर त्या जागा १००% भरण्यासाठी सुगम क्षेत्रात १० वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या शिक्षकांमधून त्या जागा भरण्यासाठी पोर्टलवर रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात आलेला आहे. 

या टप्प्यातील पात्र ठरलेल्या शिक्षकांच्या प्रकारानुसार योग्यप्रकारे वर्गवारी करून आपल्या माहितीसाठी कोणकोणत्या शाळांवर जागा रिक्त आहे हे एकाच दृष्टीक्षेपात येण्यासाठी तालुकानिहाय रिक्त जागांचा तपशील देण्यात आलेला आहे. 

शक्यतो या टप्प्यात पोर्टल मार्फतच पदस्थापना होण्याची शक्यता जास्त आहे. परंतु, फॉर्म भरण्याची वेळ आलीच तर ह्या याद्या आपणांस उपयुक्त ठरू शकतात.

यादी पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.👇

👉 प्राथमिक शिक्षक रिक्त यादी UGT


👉 मुख्याध्यापक रिक्त पदांची यादी HM


👉 गणित-विज्ञान पदवीधर रिक्त पदांची यादी Gr.Tr.MAths/Sci


👉 भाषा पदवीधर रिक्त पदांची यादी Gr.Tr.Lang.


👉 सामा.शास्त्र पदवीधर रिक्त पदांची यादी Gr.Tr.Soc/Sci


👉 सर्व रिक्त पदांची एकत्रित यादी


धन्यवाद !

Sunday, 29 November 2020

शाळा सुरु होतांना

       


     कोविड-19, कोरोना हे असे शब्द आहेत की, त्यांनी केवळ काही महिन्यांमध्ये सबंध विश्वाला आपली विनाशकारी शक्तीची झलक दाखवून दिली. बस, टॅक्सी, रेल्वे, विमान, हॉटेल्स, लहानमोठे उद्योग, कारखाने, कार्यालये सर्वकाही बंद बंद आणि बंद. सामान्य माणसाला जीवनावश्यक वस्तूंसाठीही घरातून बाहेर पडणे बंद करून टाकले. मोठमोठे उत्सव, सण, समारंभ, लग्न कार्यात होणारी गर्दी सारे काही बंद. एवढंच काय तर अंत्यविधीलासुद्धा वीस पेक्षा जास्त लोकं जमत नाहीत. या सगळ्या गोष्टींवर सरकारला निर्बंध घालावे लागलेत. हे निर्बंध काटेकोरपणे पाळले गेले नसते तर ........ तर नक्कीच आपल्या देशाची, आपल्या राज्याची परिस्थिती आज आहे त्यापेक्षा निश्चितच खूप वेगळी राहिली असती. हे वेगळे सांगायला नको. शासनाने बंद केलेल्या अनेक गोष्टींमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे. ती गोष्ट म्हणजे शाळा. कोरोनाचा प्रभाव जसजसा कमी व्हायला सुरुवात झाली तसतश्या बंद केलेल्या सर्व गोष्टी हळू हळू पूर्वपदावर येवू लागल्यात. मात्र शाळा अजून पूर्वपदावर आल्या नाहीत. दिवाळीनंतर तरी शाळा सुरु होतील असे वाटत होते. पण दिवाळीच्या धामधूमीत आपण थोडे केयरलेस वागलो की काय (कदाचित याला सध्या वाढलेली थंडीही कारणीभूत असावी) पण दिवाळीपूर्वी अगदीच नगण्य होत चाललेले संसंर्गाचे आकडे दिवाळी संपता संपता पुन्हा फुगायला लागलेले दिसून आलेत. आणि त्यामुळे दिवाळीनंतर शाळा उघडेल या आशेवर असलेले विद्यार्थी, पालक, शिक्षक, शासन, शिक्षणप्रेमी, समाज या सर्वांचाच भ्रमनिरास झाला. शासन आणि प्रशासन यांनी शाळा सुरु करण्याची संपूर्ण पूर्वतयारी केलेली असतांना सुद्धा ऐनवेळी शासनाला शाळा सुरु करण्याचा विचार काही काळासाठी पुढे ढकलावा लागला. 

२०२० संपता संपता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल अशी अशा करूया. भारतासह जगभरात कोरोनाच्या लसीवर सुरु असलेल्या युद्धपातळीवरील प्रयत्नांना यश येण्यासाठी विधात्याकडे मन:पूर्वक प्रार्थना करूया. असे जर झाले तर नक्कीच सध्याच्या विराण झालेल्या शाळांच्या इमारतींमध्ये पुन्हा एकदा बालगोपाळांची किलबिल ऐकायला मिळेल. सध्या आत्माविहीन अवस्थेत असलेल्या विद्यामंदिरात विद्यार्थीरूपी आत्मा येईल आणि ओसाड खंडर वाटणाऱ्या शाळेच्या इमारती सरस्वतीची खरीखुरी मंदिरे बनतील. अशी आशा करूया. तोपर्यंत अजून काही दिवस पालकच आपल्या बालकांचे शिक्षक आहेत. पालकांनी आपल्या मोबाईलवर येणाऱ्या अभ्यासविषयक बाबींसाठी आमच्या विद्यार्थ्यांना सहकार्य करा. डिजिटल  पॅरेंन्टींगची संकल्पना समजून घेऊन मुलांना अभ्यासात मदत करा. हीच अपेक्षा आहे.

विश्वास ठेवा शाळा लवकरच सुरू होतील आणि यावर्षी मागे राहिलेला अभ्यास पूर्ण करून घेण्याचे प्रामाणिक प्रयत्न शाळांमार्फत नक्कीच केले जातील. तोपर्यंत आपण सर्वजण कोविड-19 चे सर्व नियम पाळूया. शासन आणि प्रशासनाकडून वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करून आपले व आपल्या कुटुंबाचे रक्षण करूया. 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' हे कुटुंबातील लहानमोठे सगळ्यांनी कायम लक्षात ठेवा. कोरोनाची लस अजून आलेली नाही, त्यावर परफेक्ट औषधही अजून बाजारात उपलब्ध नाही. मग का म्हणून विषाची परीक्षा बघायची. गेल्या आठ महिन्यांमध्ये जगभरात कोरोनाचे एवढे भयानक तांडव सुरु असतानाही त्याला आपण आपल्यापर्यंत पोहचू दिले नाही. आता तर त्याचा अंत व्हायची वेळ आलेली आहे. मग आता थोड्याकरता तरी त्याला कशाला जवळ येण्याची संधी द्यायची. हत्ती निघून गेला आता फक्त शेपूट बाकी आहे. एवढे लक्षात ठेवा आणि त्यासाठी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.

Friday, 24 July 2020

नाशिक शिक्षण हेल्पलाईन

*शिक्षण विभाग, जि.प.नाशिक व स्वयंसेवी संस्था यांच्या प्रयत्नाने शाळा बंद असतांनाही पालक, विद्यार्थी व शिक्षकांना तंत्रशुद्ध शैक्षणिक मार्गदर्शन करण्यासाठी तयार केलेली टेलिग्राम अँप वरील नाशिक शिक्षण हेल्पलाईन जॉईन करण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ.*

https://youtu.be/R4C-3WmMvqc

*हा व्हिडीओ आपल्या विद्यार्थ्यांना/पालकांना पाठवून त्यांनी Telegram app वरील नाशिक शिक्षण हेल्पलाईनला कसे जॉईन व्हावे? यासाठी या व्हिडीओचा आधार घेण्यास सांगावे.*

https://youtu.be/R4C-3WmMvqc

*व्हिडीओ आवडल्यास*
*Like 👍*
*Share ▶️*
*Comment ©️*
आणि *subscribe 🔔* जरूर करावे.🙏🏻😊

धन्यवाद🙏🏻
Raju Morkar (Manikkhamb)

BYJUJ app Information

Save the Children या संस्थेकडून आपल्या शाळेतील स्मार्टफोन वापरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाईल क्रमांकावर BYJUJ app रजिस्टर करून मिळणार आहे.

जि.प.शाळा, माणिकखांबची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Monday, 13 July 2020

ICT Online Education Training Igatpuri

Chatting in Zoom Meeting

दि.१३/७/२०२० रोजी झालेल्या शिक्षकांच्या online training मधील शिक्षकांच्या प्रतिक्रिया वाचण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.

Saturday, 4 July 2020

आमचे विद्यार्थी

  • आमच्या जि.प.शाळा- माणिकखांब येथील विद्यार्थी चेतन पगारे याने सध्याच्या कोरोना विषाणूच्या भयंकर परीस्थितीत पालकांसाठी स्वतःच्या मनाने एक पत्र लिहिले आहे. ते खास आपल्याला वाचण्यासाठी येथे उपलब्ध करून दिलेले आहे. 
                        चेतनचे अभिनंदन !

Tuesday, 28 April 2020

आपल्या मोबाईल वरून ऑनलाईन टेस्ट बनवा



https://youtu.be/qB2ZWlWJOgQ

COVID 19 कोरोना मुळे सगळे जग थांबले आहे परिणामी आपल्या शाळाही बंद आहेत. मात्र आपण शक्य त्या प्रकारे विद्यार्थ्यांशी संपर्कात राहून त्यांचा अभ्यास करून घेत आहोत.
यात प्रामुख्याने ऑनलाईन टेस्टचा जास्त वापर होतांना दिसून येतो.
कोणीतरी तयार केलेली टेस्ट आपल्या विद्यार्थ्यांना दिली जाते, विद्यार्थी ती टेस्ट सोडवतातही परंतु, शिक्षक म्हणून आपल्याला विद्यार्थ्यांनी दिलेले उत्तर दिसायला पाहिजे ते दिसत नाही.
म्हणून आपल्या अँड्रॉईड मोबाईल वरून आपण स्वतः टेस्ट कशी तयार करू शकतो ते मी या व्हिडिओ मधून सांगितलेले आहे. 15 मिनिटांत आपणही आपली स्वतःची टेस्ट बनवू शकतात. खालील लिंकला क्लिक करा.
व्हिडीओ बघून टेस्ट बनविण्याचे प्रात्यक्षिक करून बघा. आपल्या विद्यार्थ्यांना पाठवा. त्यांनी दिलेली उत्तरे एका क्लिकवर बघा. तुम्ही सुद्धा तंत्रस्नेही व्हा.
आवडल्यास Like करा
याप्रकारचे व्हिडीओ बघण्यासाठी चॅनलला Subscribe करा आणि आपल्या ग्रुपमध्ये share करा.
आणि हो काही शंका असल्यास व्हिडिओच्या खाली comments करायला विसरू नका.

https://youtu.be/qB2ZWlWJOgQ

Tuesday, 7 March 2017

जागतिक महिला दिनाच्या हार्दीक शुभेच्छा

आपल्या परिवाराला सुखी आणि आनंदी ठेवण्यासाठी माता, भगिनी, कन्या, पत्नी, सखी, सहकारी, मैत्रीण, इत्यादी विविध भूमिका साकारणाऱ्या आणि आजच्या युगात पुरुषांसाठी राखीव मानल्या गेलेल्या सर्व क्षेत्रांत तेवढ्याच सफलतेने आपला ठसा उमटवणाऱ्या अशा सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दीक शुभेच्छा !! 

 





Tuesday, 7 February 2017

पायाभूत सुविधांचा श्रीगणेशा शिक्षक सहभागातून

     माझ्या शाळेत एकूण १७० विद्यार्थी आहेत. जून २०१६ पासून जि.प.प्राथमिक शाळा, उंबरकोन, ता.इगतपुरी, जि.नाशिक या शाळेचा मुख्याध्यापक पदाचा कारभार स्वीकारला तेंव्हापासून काही महत्त्वाचे विषय डोक्यात होते. पहिला म्हणजे पिण्याच्या पाण्याची सुविधा. विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे. ही मुख्याध्यापकाची जबाबदारी नंतर ठरते. प्रथम ते मुख्याध्यापकाचे कर्तव्यच असते. असे माझे ठाम मत आहे. मात्र हे कर्तव्य तसेच जबाबदारी पार पाडणे हे मोठे दिव्यच आहे. प्रथमदर्शनी तरी माझ्यासह सर्वांना असेच वाटत होते. पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसाठी नजरेसमोर असणाऱ्या सर्व शक्यता मी पडताळून पाहू लागलो. सध्यातरी त्यावर गुणकारी उपाय सापडत नव्हता. 
          एकेदिवशी दुपारचे जेवण करतांना माझ्या सहकाऱ्यांशी या विषयावर चर्चा केली. चर्चा सुरु असतांना एक विचार पुढे आला. क्षणाचाही विलंब न करता तो विचार अमलात आणायचा असे ठरवले गेले. पाण्याची ७०० फुट पाईपलाईन, किमान १००० ली. क्षमतेची पाण्याची टाकी. ६ ते ८ नळ, त्यासाठी पक्के बांधकाम, त्याआधी जुने बांधकाम हटवणे, जागा तयार करणे. इत्यादी इत्यादी. अंदाजे खर्च रु.२५,०००/- ते रु.३०,०००/-. कोणतेही अनुदान नाही. सध्या कोणताही लोकसहभागही जमा होण्याची काही शक्यता नव्हती. म्हणून आम्ही सर्वांनी हे काम शिक्षक सहभागातून करायचे ठरवले. आणि हाच तो विचार होता जो आमच्या त्यादिवसाच्या चर्चेतून समोर आला होता. प्रथम विचार मनात आला आणि लगेच तो अमलात आणला. या गोष्टीसाठी माझ्या सर्व सहकाऱ्यांना त्यांच्या मुख्याध्यापकाचा सलाम.
        माझ्या प्रत्येक म्हणजे ६ सहकाऱ्यांनी प्रत्येकी रु.३०००/- जमा केले. उर्वरित मी केले. असे एकूण रु.१८०००/- + रु.१००००/- = रु.२८,०००/- जमा झाले. गाव पाणीपुरवठ्याच्या टाकीतून पाऊन इंची डायरेक्ट कनेक्शन मिळाले. डायरेक्ट कनेक्शन म्हणजे गावाच्या पाणी पुरवठ्याच्या वेळेवर अवलंबून न राहता शाळेला पाहिजे तेंव्हा पाणी मिळेल असे कनेक्शन. त्याबद्दल उंबरकोन ग्रामपंचायतीचे मन:पूर्वक आभार. गावातीलच श्री.प्रकाश भांगरे नावाचा एक चांगला कारागीर मिळाला. एकदम कमी मोबदल्यात कमी वेळेत त्यांनी काम पूर्ण केले. आणि शिक्षक सहभागातून आमची एक महत्त्वाची प्रथम पायाभूत गरज पूर्ण झाली. प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र समारंभात विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते जलपूजन करण्यात आले. पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिल्याचा जेवढा आनंद आम्हां शिक्षक, पालक व ग्रामस्थांना झाला त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मोठा आनंद आमच्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आम्ही पाहिला.



      अशाप्रकारे पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या पायाभूत सुविधेचा श्रीगणेशा माझ्या शिक्षकांच्या सहभागातून झाला. याचा मला सार्थ अभिमान वाटतो.

             







      आता प्रत्येक वर्गात ई-लर्निंग साठी एक ३२ इंची टीव्ही आणि अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर असावे या दृष्टीने विचार सुरु आहे. अजमाईश कडी है, इम्तेहान मुश्कील है, लेकीन हौसला बुलन्द है l त्यासाठी लोकसहभाग नक्कीच मिळेल यात शंका नाही. कारण पालकांचा आणि गावाचा विश्वास जिंकण्यात आम्ही नक्कीच यशस्वी झालो आहोत. परंतु गावातल्या लोकसहभागातून एवढे मोठे लक्ष्य साध्य होणे अवघड आहे. त्यासाठी आपल्यासारख्या सन्मित्रांची आवश्यकता भासेल. प्रत्येकवेळी आर्थिक सहकार्यच उपयोगी पडते असे नाही. आपल्या शुभेच्छा मिळाल्या आणि पाठीवर हात ठेवून नुसतं लढ म्हटलं तरी काम होईल. 

धन्यवाद !
              आपलाच
             श्री.राजेंद्रसिंग रामसिंग मोरकर
             मुख्याध्यापक
             जि.प.प्राथमिक शाळा, उंबरकोन
             ता.इगतपुरी, जि.नाशिक
             9421562194 

Tuesday, 13 September 2016

लोकसहभागातून शाळासिद्धीच्या दिशेने पहिले पाऊल

ग्रामीण आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेला लोकसहभाग मिळविणे म्हणजे एक दिव्यच म्हणावे लागेल. पण एकदा गावाचा विश्वास संपादन केला की हेच दिव्य अगदी सहज शक्य होतानाही आपण अनुभवलेले आहे. 
शाळेला ई-लर्निंगसाठी एक संगणक संच असावा यासाठी गेल्या महिनाभरापासून प्रयत्न सुरु होता. त्या प्रयत्नाला यश आले. मा.आमदार ताई यांच्या निधीतून एक संगणक मंजूर केला. रोटरी क्लबकडून  ई-लर्निंग संच लवकरच प्राप्त होणार आहे. माझ्या शाळेला दैनंदिन परिपाठ व इतर प्रासंगिक कार्यक्रमासाठी एका चांगल्या साऊंड सिस्टिमची आवश्यकता होती. तसेच आता शाळा डिजीटल होणार आणि गावात १०-१२ तास लोड-शेडींग असणार. मग त्या ई-लर्निंग आणि डिजीटलला काय अर्थ असणार ? म्हणून त्यावर उपाय शोधणे गरजेचे होते. एखादा Power Inverter उपलब्ध झाला तर ? पण सध्या यासाठी शाळेकडे एक पैसाही उपलब्ध नाही. मग हे कसे शक्य होईल ? अनेक वेळा हाच विषय आणि हीच चिंता मी गावचे शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांना सांगत राहिलो. त्याचा परिणाम आज शाळेला रुपये ४०,०००/- चा लोकसहभाग मिळाला.  त्यातून शाळासिद्धीच्या दिशेने एक पाऊल टाकणे शक्य झाले.


                     (रु.२५५००/- चा Inverter)







------------------------------------------------------------------------------







(रु.१४५००/- चा portable Rechargeble Sound System)



मार्ग खडतर आहे त्यावर चालणे अवघड आहे पण अशक्य मात्र नक्कीच नाही. याबाबत मी आणि माझे सर्व सहकारी एकमताने काम करत आहोत म्हणून हे शक्य होत आहे. 
सुरुवात तर चांगलीच झाली. अजून खूप काही होवू शकते. त्यासाठी सतत प्रयत्नशील आहे.

श्री.राजेंद्रसिंग मोरकर 
मुख्याध्यापक 
जि.प.प्राथमिक शाळा, उंबरकोन
ता.इगतपुरी, जि,नाशिक

Monday, 12 September 2016

नवीन शाळेतील माझ्यासमोरची आव्हाने

जून 2016 पासून जि.प.प्राथमिक शाळा, उंबरकोन, ता.इगतपुरी, जि.नाशिक या शाळेत बदली झाली. येथे मुख्याध्यापक म्हणून पदभार स्वीकारताना माझ्यासमोर मला काही आव्हाने दिसत होती. इ. 1 ली ते 7 वी पर्यंत वर्ग. एकूण 170 विद्यार्थी. आम्ही 8 शिक्षक. शाळेची गुणवत्ता तशी चांगलीच आहे. मुलं चुणचुणीत आहेत. परंतु भौतिक सुविधांवर मात्र अजून खूप काम करावे लागेल. सर्वांसाठी पुरेशा पाण्याची व्यवस्था, अद्ययावत स्वच्छतागृह, विद्युतीकरण ह्या मूलभूत बाबी पूर्ण करणे हे माझे प्रथम काम आहे. त्यादृष्टीने कार्यवाही सुरु झाली आहे.
त्यानंतर लवकरच शाळा ई-लर्निंग करणे, डिजीटल शाळेचे सर्व निकष पूर्ण करून 'शाळा सिद्धी' च्या दिशेने वाटचाल करणे. हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून कामकाज सुरु आहे. आज नाही तर उद्या, पण यश नक्कीच मिळेल यात मलातरी शंका नाही.

Sunday, 28 February 2016

स्वप्न साकार झाले



'माझे डिजीटल शाळेचे स्वप्न' या शीर्षकाचा एक लेख जवळपास एक वर्षापूर्वी मी माझ्या ब्लॉगवर लिहिला होता. 'डिजीटल शाळा' हे एकच ध्येय उराशी बाळगून मी तेंव्हापासून कामाला लागलो. पदाधिकारी, अधिकारी व सहकारी यांच्या सहकार्यातून वर्षभरात केवळ लोकसहभागातून माझी शाळा डिजीटल झाली.
कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी आधी सूक्ष्म पातळीवरचे नियोजन आवश्यक असते. आणि ते नियोजन राबविण्यासाठी स्वतःला झोकून देऊन काम करावे लागते. त्यानुसार काम केले आणि त्याचे फळही मिळाले.
तालुका व जिल्हाभरात संगणकाच्या कामांसाठी शिक्षकमित्र व अधिकारी मला ओळखतात. संगणकाशी संबंधित कोणतेही काम असले की मोरकर सरांचे नाव समोर येते. पण माझ्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंगची सुविधा नाही, हे सांगताना मला फार वाईट वाटत होते. आजही अनेक शाळा अशा आहेत की, तेथे संगणक प्रयोगशाळा आहे, लोकवर्गणी भरपूर असल्याने LCD प्रोजेक्टर आहे, सुसज्ज हॉल आहे. परंतु, संगणक हाताळणारे शिक्षक नसल्याने ही महत्वपूर्ण साधने फक्त वस्तू म्हणून शाळेत पडून आहेत. त्यांचा वापर नसल्याने ते नादुरुस्त झाले आहेत. आणि ज्याठिकाणी हे सर्व हाताळणारे सकुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे त्या ठिकाणी साधने उपलब्श नाहीत. माझ्या बाबतीतही असेच होते. परंतु, सध्याच्या काळात वाडी-वस्तीवरील अनेक शाळांमध्ये ह्या सुविधा काही सामाजिक संस्था, लोकसहभाग आणि शिक्षक सहभागातून मिळवून त्याचा प्रभावी वापर होण्याची चळवळच जणू आपल्या महाराष्ट्रात सुरु झालेली आहे. त्यातलाच मीही एक.
नाशिक तालुक्यातील जवळपास ज्या शाळांमध्ये ई-लर्निंगची सुरुवात झालेली आहे त्या शाळांना माझ्या शाळा व्यवस्थापन समितीच्या भेटीचे नियोजन केले. त्या भेटींमधून शाळा व्यवस्थापन समितीला ई-लर्निंगचे महत्त्व समजावून दिले. यातच माझे ६०% ध्येय साध्य झाले. वर्गखोलीची रंगरंगोटी, पडदे, लाईट फिटींग, पंखे इ. बाबी व प्रोजेक्टर यासाठी निधी कसा उभा करावा याच गोष्टीचा आम्ही सर्वजण विचार करत होतो. तेंव्हा लहान लहान पावती पुस्तके छापून वर्गणी गोळा करण्याचे सर्व सदस्यांनी मान्य केले. एल.सी.डी.प्रोजेक्टरसाठी रोटरी क्लबकडे मागणी केली. प्रोजेक्टर आज मिळेल उद्या मिळेल या अपेक्षेने वर्गखोली तयार करण्याची लगबग सुरु झाली. सदस्यांनी आपापल्या लोकसंपर्कानुसार वर्गणी गोळा केली आणि पाहता पाहता ४००००/- रुपये गोळा झाले. गावातील पेंटरने कमी पैशात उत्कृष्ट वर्ग तयार करून दिला. इलेक्ट्रिशियनने ना नफा ना तोटा या तत्वाने फक्त साहित्याचे पैसे घेतले. मजुरी घेतली नाही. डिसेंबर अखेर वर्ग तयार झाला. परंतु, एल.सी.डी.प्रोजेक्टर मिळण्याचे चिन्ह काही दिसत नव्हते. ती शक्यता हळूहळू धूसर होत चालली होती. शेवटी शाळा व्यवस्थापन समितीने ठरवले की, आता आपण आपल्या लोकवर्गणीतूनच प्रोजेक्टर आणू. आता जास्त काळ थांबणे शक्य नव्हते. कारण इतर शाळांच्या मानाने अजून एका वर्षाने मागे पडणे आम्हाला अजिबात मान्य नव्हते.
एल.सी.डी.प्रोजेक्टरची शोधाशोध सुरु झाली. शेवटी EPSON चा 3200 lumense चा EB-S31 हा प्रोजेक्टर आम्ही खरेदी केला. शाळेतीलच एक संगणक जोडून संच तयार केला. शिक्षकाला वर्गात हालचाल करण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी सोयीचा म्हणून cordless mouse व keyboard चा वापर केला. ई-लर्निंगचे स्वप्न पूर्ण झाले. उद्घाटनाच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. दिनांक १९ जानेवारी २०१६ रोजी मा.ना.विजयश्रीताई चुम्भळे, अध्यक्षा, जि.प.नाशिक, मा.श्री.अनिलजी ढिकले, उपसभापती, पंचायत समिती, नाशिक,  मा.श्री.रवींद्रसिंग परदेशी, गटविकास अधिकारी (उ.श्रे.), पंचायत समिती, नाशिक यांच्या शुभहस्ते उद्घाटन झाले. मा.श्री.अनिल शहारे, गटशिक्षणाधिकारी यांची प्रेरणा व मा.भाऊसाहेब जगताप, विस्तार अधिकारी (शिक्षण) आणि मा.श्रीमती एस.जी.घमंडी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
आमचे सरपंच मा.श्री.विजय जगताप यांनी चांगली आर्थिक मदत मिळवून दिली. SMC उपाध्यक्ष, मा.बाळकृष्ण जगताप यांनी निधी संकलनाबरोबरच अहोरात्र धावपळ करून खूप सहकार्य केले. मा.सौ.चंद्रकला जगताप, सौ.शकुंतला जगताप, श्री.शरद जगताप व श्री.रामदास जगताप या सर्वांच्या प्रयत्नांनी हे स्वप्न साकार झाले.
फक्त ई-लर्निंगनेच सर्व साध्य होणार नाही म्हणून माझ्या सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी आपापल्या वर्गासाठी अत्यंत उत्कृष्ट व उपयुक्त ज्ञानरचनावदाचे साहित्य तयार करून त्याचा वापर करत आहेत.  ई-लर्निंगचे स्वप्न साकार झाले. आता  ई-लर्निंग व ज्ञानरचनावद यांच्या सहाय्याने अप्रगत विद्यार्थी विहीन शाळा हे स्वप्न साकार करण्याचे काम सुरु आहे.
धन्यवाद !!!




Thursday, 23 April 2015

एल.सी.डी. प्रोजेक्टरचे स्वप्न साकार होत आहे

काही झाले तरी आपल्या शाळेत एल.सी.डी.प्रोजेक्टर आणयचा आणि विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने अध्यापन करायचे असा चंग मनाशी बांधला आहे. त्या दिशेने प्रयत्न करत असताना एक आशेचा किरण दिसू लागला आहे. शाळा व्यवस्थापन समिती व मा. सरपंच यांच्याशी चर्चा करून त्यांना एल.सी.डी.प्रोजेक्टरचे महत्त्व समजावून सांगितले. ज्या शाळांमध्ये त्याचा वापर होत आहे अशा शाळांची भेट घेऊन शाळा व्यवस्थापन समिती एल.सी.डी.प्रोजेक्टरच्या तयारीला लागली आहे. गावातून लोकवर्गणी जमा करूनच आपण एल.सी.डी.प्रोजेक्टर आपल्या शाळेत आणू आणि हे काम आपण जून 2015 अखेर पूर्ण करू असा चंग शाळा व्यवस्थापन समितीने बांधला आहे. मा.सरपंच आणि सदस्य, ग्रा.पं.सामनगाव ह्यांनीही या कार्यात आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. त्याबद्दल सर्व सन्माननीय पदाधिकारी, पालक व ग्रामस्थ यांचे मी आभार मानतो. एवढे सगळेजण आपला प्रामाणिक प्रयत्न करत असताना अपयश येण्याची दूर-दूर पर्यंत शक्यता वाटत नाही. त्यामूळे शाळेच्या डिजीटल वर्गखोलीची पूर्वतयारी सुरू झालेली आहे. लवकरच आमच्या शाळेचे एल.सी.डी.प्रोजेक्टरचे स्वप्न साकार होईल याची खात्री मला वाटत आहे.

श्री.राजेंद्रसिंग रामसिंग मोरकर
मुख्याध्यापक
जि.प.प्रा.शा.सामनगाव

Monday, 30 March 2015

एक अभिनव उपक्रम

अधिकारी व्हायचंय मला
'अधिकारी व्हायचंय मला' या सकाळ वृत्तपत्र समूह व जिल्हा परिषद, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.29 मार्च 2015 रोजी MPSC-UPSC परीक्षांच्या धर्तीवर झालेल्या परीक्षेत माझ्या शाळेतील 15 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. परीक्षेचे नियोजन उत्तम होते. 12 km. प्रवास करून परीक्षा दिल्यानंतरही त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. एक वेगळ्याप्रकारची व भावी आयुष्यात मार्गदर्शक ठरणारी परीक्षा देण्याचा अनुभव या आगळ्या-वेगळ्या उपक्रमामुळे माझ्या खेड्यातील जि.प.शाळेतील मुलांना मिळाला. त्याबद्दल सकाळ वृत्तपत्र समुह व जि.प.नाशिक यांचे आभार. हा उपक्रम दरवर्षी व्हावा ही अपेक्षा.
पळसे केंद्रातील परीक्षेचा एक क्षण

परीक्षार्थींना मार्गदर्शन करताना मा.श्री.रवींद्रसिंह परदेशी, गटविकास अधिकारी, पं.स.नाशिक


परीक्षाकेंद्राला भेट देताना मा.श्री.अनिल शहारे, गटशिक्षणाधिकारी, पं.स.नाशिक

दि.30/03/2015 च्या दैनिक सकाळ मधील मला व्हायचंय अधिकारी संबंधी अधिक बातम्यांसाठी क्लिक करा

Sunday, 29 March 2015

माझे DIGITAL SCHOOL चे स्वप्न


सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. प्रत्येकाला Android Mobile चे वेड लागले आहे. लहान-मोठ्या सगळ्यांची बोटे Android च्या टचस्क्रिनवर फिरायला लागली आहेत. विशेष म्हणजे मोठ्यांपेक्षा लहान मुले अगदी सफाईदारपणे Touch Screen हाताळतात. मुलांच्या विशेष आवडीची गोष्ट म्हणजे Games आणि Music / Videos. मुलांच्या हाती एकदा मोबाईल लागला की, तासन् तास अगदी एकाग्र होऊन मोबाईलशी खेळत असतात. हे चित्र फक्त शहरातच नाही तर खेड्यातही अगदी सर्रास दिसू लागले आहे. अशावेळी त्याला 'पुस्तक-वही घे आणि अभ्यासाला बस..' असे आपण सांगितले तर त्याची नाराजी त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येते. अभ्यासाला बसायचा आपला उपदेश जरी त्याने नाईलाजास्तव ऐकला तरी अभ्यासामध्ये त्याचे मन किती रमेल याची आपण कल्पना करू शकतो.

मुलांच्या Touch Screen च्या वेडाचा आपल्याला अभ्यासासाठी उपयोग करून घेता येईल का ? मुले मोबाईलमध्ये जेवढे तल्लीन होतात तेवढे अभ्यासामध्ये तल्लीन होतील का ? या प्रश्नांचा एका जि.प.शाळेचा मुख्याध्यापक म्हणून विचार करत असतांना एकच प्रभावी उत्तर सापडले. ते उत्तर म्हणजे त्याचा रोजचा अभ्यासच त्याला Touch Screen वर Games, Activities आणि कार्टुन्सच्या स्वरूपात उपलब्ध करून दिला तर हे शक्य आहे. 
आज इंग्रजी व मराठीतून विद्यार्थ्यांसाठी अनेक Apps उपलब्ध आहेत. तसेच संपूर्ण अभ्यासक्रमही सॉफ्टवेअरच्या रूपाने उपलब्ध आहे. तसेच Activity Based E-Books सुध्दा उपलब्ध आहेत. या सर्वाचा कल्पकतेने वापर करून विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे आकर्षित करता येऊ शकते. त्यासाठी गरज आहे फक्त एका साधनाची. ते साधन म्हणजे I-Pad. आयपॅड हे असे साधन आहे की, त्यात विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या अभ्यासाच्या सर्व Apps व Softwares सोबतच इतर सामान्यज्ञान व मनोरंजनाचे साहित्यही सहज उपलब्ध करून देता येऊ शकते. शिवाय कॉम्प्युटर आणि लॅपटॉप या सारख्या महागड्या साधनांपेक्षा त्याची किंमतही बरीच कमी आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझेही कमी करणे शक्य होईल.
वरील सर्व बाबींचा विचार करता विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे आकर्षित करण्याकरीता आयपॅड अतिशय उपयोगी ठरेल. परंतु, अडचणीचा भाग आहे तो म्हणजे आयपॅडसाठी आमच्या सारख्या गरीब शाळांनी निधी कसा उभा करावा ? एका शाळेकरीता 8 ते 10 आयपॅड पुरेसे होतील. कारण गटाने त्याचा वापर केल्यास विद्यार्थी-विद्यार्थी आंतरक्रिया चांगली होईल. 8 आयपॅडसाठी साधारणत: 48000/- ते 56000/- इतका खर्च येऊ शकतो. त्यासाठी गावातील काही दानशूर व्यक्ती किंवा संस्था पुढे आल्यास माझे Digital School चे स्वप्न पूर्ण होण्यास काही वेळ लागणार नाही. 
माझा हा बऱ्याच प्रमाणात लांबलेला लेख वाचणारे कुणी शिक्षक असतील, कुणी अधिकारी असतील, सामाजिक कार्यकर्ते, नेते, पालक, व्यावसायिक, अन्य क्षेत्रातील नोकरदार किंवा बेरोजगार तरूणही असतील. आपण ठरवले तर आपापल्या परीने आपण आमच्या शाळांना याकामी मदत करू शकता. कसे ते आपणच ठरवा. 
ता.क.
चांगली असो वा वाईट आपली Comment (प्रतिक्रीया) जरूर कळवा.
धन्यवाद.